शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

POLICE AANI SARVSAMANYA......

               शुक्रवारी बाजाराच्या दिवशी धनगरवाड्यावरच्या लोकांना भेटण्यासाठी मी आजरा बस स्थानकावर गेलो होतो . मी लोकांशी चारच करत असताना पहिले कि दोन युवक कॉलेजच्या मुलींकडे पाहून काहीतरी बोलत  होते . त्या मुली  त्यांच्यापासून अवघ्या १० फुटांवर होत्या . त्या मुलींना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन ती दोन मुले करत होती . माझ्यासहित स्थानाकावाराच्या कित्येक माणसांना त्या दोघांचे वागणे खटकत होते ;पण त्यांना विचारायला जायला कुणाचीच हिम्मत होत नव्हती .' नसते लचांड कशाला ?' म्हणून या घटनेला लोक बगल देऊन जात होते . मुली इतक्या धाडशी व सक्षम नव्हत्या कि त्यांना विचारायला जातील . म्हणून मी विचारायला जायचे ठरवले . परंतु थोडा वेळ विचार करून पोलिसांना फोन करणे योग्य होईल म्हणून पोलिसांना फोन केला . पोलिस १० मिनिटांत आले . पैकी 'माणुसकी फौंडेशन 'च्या कामातून ओळख झालेले दोन पोलिस आणि एक तरुण पोलिस अधिकारी आले . आल्याबरोबर त्यांनी मला जाब विचारला , 'फोन तू लावला होतास काय ? कुठं हाईत ती मुलं ?' असे त्यांनी मला विचारायला सुरुवात केल्यानंतर स्थानाकावरच्या  बाकीच्या लोकांना कळले कि मी फोन करून ह्या पोलिसांना बोलावले आहे . मलासुद्धा ' झक मारली ' असं क्षणभर वाटून गेले . पोलिस अधिकारी आपल्या बुलेटवरून गाजावाजा करत आल्यावर मुलं कशाला थांबतील ! ती केंव्हाच तिथून पसार झाली होती वास्तविक पोलिसांनी चुपचाप येउन हि कारवाई केली असती तर ते दोघे सापडले असते आणि बस स्थानकावर येणाऱ्या बाकीच्या रोडरोमियोंना धडा मिळाला असता . पण असे झाले नाही .
        मुल किस्सा तर पुढेच आहे . ते तरुण पोलिस अधिकारी मला म्हणाले कि " तूच मुलींना बघायला इथं आला असशील……  !" मला चीड आली . मी म्हटले कि , ' मला तुम्ही ओळखता का ?' …. तोपर्यंत त्या अधिकाऱ्यांच्या गाडीवर बसून आलेल्या हवालदारांनी सांगितले कि ' ते समाज सेवक आहेत ,शिक्षक आहेत . ' 'बरं मग माझा फोन नंबर घ्या ' असे फर्मान त्या अधिकाऱ्यांनी सोडले . अर्थात मी फोन नंबर घेतला नाही . पण मला त्या अधिकार्याच्या बोलाण्याच्या  पद्धतीबद्दल मला चीड आली . माझी मुळ ओळख झाल्यानंतर त्यांच्या वागण्यात बदल झाला हेही मला खटकले . दुसर्या कुठल्या तरी सर्वसामान्य माणसाने फोन केला असता तर ह्या वागण्यात बदल झाला नसता . 
         मुळात पोलिसांना लोक भितात .( गुन्हेगारी मग का वाढते हा नंतरच्या चर्चेचा विषय आहे !) सामान्य माणसाच्या दारात पोलिस उभे राहिल्यानंतर त्यच्या पोटात गोल येतो . गाडीची संपूर्ण कागदपत्रे हेल्मेटसहित असली तरी आपण ट्राफिकवाल्याला घाबरतो . सर्वसामान्य माणसाला पोलिसांना बघून जो धीर , निर्धोकपणा वाटायला हवा तो वाटत नाही . सगळ्यांनाच वाटते कि पोलिस आपला मित्र असावा ; तो शत्रू असू नये . असे मलाही वाटतेच कि ! परंतु आपण केलेल्या चुकांना त्याने पाठीशी घालावे म्हणून , आपला रुबाब वाढावा म्हणून ! कित्येक छोटे मोठे पुढारी हा 'आदब ' राखण्याचा तो वाढवण्याचा प्रयत्न करत असतात . मला खूप कीव वाटते अशांची ! ह्या विषयावर लिहावे असे खूप दिवसांपासून वाटत होते . या घटनेचं निमित्ताने याला वात मिळाली . मी बचावात्मक अजिबात लिहिणार नाहीये . 
       मी दोन वर्षे माझ्या पोलिस मामाकडे पोलिस कॉलनीत राहिलो आहे . त्यामुळे एका पोलिसाचं खाजगी आयुष्य आणि नोकरी यांचा मी जवळचा साक्षीदार आहे . अधिकार्याने ताशेरे काढलेल्या दिवशी मामाच्या घरात हमखास भांडणं असायची . हप्ते न आलेल्या शुक्रवारी संबधित ' उद्योजका'ला मामाच्या अगणित घाणेरड्या शिव्यांची लाखोली पडायची . बंदोबस्ताच्या काळात पोलिसांचे खूप हाल होतात . निवांत कौटुंबिक आयुष्य कोसो दूर !त्यामुळे चीडचीडेपणा , तणाव असणे साहजिक आहे . तो व्यक्त करण्यची प्रत्येक पोलिसाची वेगळी हातोटी असते . परंतु हा तणाव निष्कारण सर्वसामान्य माणसांवर उतरवणे अयोग्य आहे. 
      माझ्या सामाजिक कार्यात पोलिसांचा रोल असतोच ! यानिमित्ताने खुपश्या पोलिस अधिकाऱ्यांशी आणि हवालदारांशी माझा जवळून संबंध आला आहे . खूप जणांना मी करत असलेल्या कामाबद्दल सहानुभूती आहे . इमाने इतबारे सेवा बजावणारे कित्येकजन आहेत . परंतु त्यामुळे असले प्रसंग डोळेझाक करण्याइतके क्षुल्लक अजिबात नाही ! कारण अशा वर्तवणूकीमुळे पोलिसांच्या मदतीला कुणीच येणार नाहीत ! खुपश्या वेळेला अपघातातल्या जखमीला उपचारां अभावी प्राण गमवावे लागले असल्याच्या बातम्या ऐकल्या आहेत . लोकांची अपघातातल्या जखमीला दवाखान्यात नेण्याची इच्छा असते . परंतु भविष्यातल्या पंचनामा आणि चौकशीचा ससेमिरा नको म्हणून लोक अक्षरशः जखमी माणसाला तडफडत सोडून पुढे निघून जातात . एक जीव जातो आणि त्याच्या जाण्याने कित्येक जीव प्रभावित होतात . पोलिसांनी ह्या बाबतीत सक्षम जनजागृती करायला हवी . कारण काही लोकांच्या  आक्षेपार्ह किंवा संशयास्पद वागण्याबद्दल जागरूक लोकांनी पोलिसांना माहिती दिली तर कित्येक गुन्हे घडायचे थांबू शकतात .  पोलिसांना फोन करणे लोकांना 'बालंट ' वाटायला नको एवढीच इच्छा ! 
      लोकांना पोलिस मदतगार वाटले पाहिजेत . तरच पोलिस आणि सर्वसामान्य लोक यांच्यात सहोदर राहून गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल !
------------------------------------------------------------------------------------------------------------

                                                                                                                      अमित प्रभा वसंत 
                                                                                                                           ८००७४१५५६७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा